देहास अनुभवाव्या लागणाऱ्या दु:खाचे वर्णन करताना पुढे श्रीसमर्थ म्हणतात की, पाेटफुगी, तडस, ठसका लागणे, दमा, धाप, गंडमाळा, घटसर्प असे खाण्याच्या सुखापासून वंचित करणारेही अनेक राेग आहेत. याशिवाय कधी कधी आपला हातपाय माेडून जाताे. कधी दुधातून चुकून शेंदूर प्यायला जाऊन आवाजाचा सत्यानाश हाेताे. याशिवाय कान, नाक, डाेळे, जीभ, त्चचा ही ज्ञानेंद्रिये आहेत.त्यांचे आजार वेगळेच आहेत. कान दुखताे, फुटताे, त्यातून रक्त येते व माणूस बहिरा हाेऊन जाताे.नाकातील मांस वाढते, गंध येईनासा हाेताे किंवा सततच्या खाेकला व पडशामुळे श्वासाेच्छ्वासही बिकट हाेऊन जाताे. डाेळ्यात फूल पडते. बुब्बुळे खराब हाेतात, पूं, खुपऱ्या, रक्तस्राव हाेताे आणि कधीकधी दृष्टी जाऊन माणूस आंधळा हाेऊन बसताे.
जिभेला व्रण पडतात, ती कधी झडते आणि मग बाेलणेही दुरापास्त हाेते, त्वचेलाही खरूज, गजकर्ण, इसब, नायटा असे नाना तऱ्हेचे त्वचाराेग हाेऊ शकतात. स्त्रियांना प्रजाेत्पादनाचे कार्य असल्याने त्यांना आणखीच वेगळे राेग हाेऊ शकतात.बरे हे केवळ शरीराचे राेग झाले. याशिवाय शरीर चालविणारा माणसाचा जाे मेंदू-त्यातही बिघाड हाेऊन मनुष्य भ्रमिष्ट, अर्धवट किंवा पूर्ण वेडा हाेऊ शकताे.त्याचे शरीर धडधाकट असूनही ताे कामातून जाताे.मानवी शरीराला ग्रासू शकणाऱ्या आणि जगणे मरणापेक्षाही दु:खकारक करणाऱ्या अशा अनेक व्याधींची ही नामावळी केवळ ऐकण्या-वाचण्यानेही आपल्याला सखेद आश्चर्य वाटते.