'
प्रकृतीची टांकसाळ म्हणजे काय हे सांगितल्यावर आपला व या भूतसृष्टीचा संबंध कसा आहे हे ज्ञानेश्वर श्रीकृष्णांच्या आधाराने समजावून सांगत आहेत. या टांकसाळीत पंचभूतात्मक अनेक नाणी बाहेर पडतात. यांची माेजदाद प्रकृती करीत असते. ही प्रकृती नाण्यांच्या रूपाने आकारास येते. नामरूप धारण करते आणि पुन्हा त्यांचा लय स्वत:त करते. यानंतर जगत् म्हणजे काय याचेही स्पष्टीकरण आले आहे. प्रकृतीने केलेला नामरूपांचा विस्तार म्हणजे हे जग.या जगाचा आदि, मध्य व अंत एक परमात्माच आहे. या परमात्म्याचा व या व्यक्त जगताचा संबंध कसा आहे? मी या सर्व जगाचा पिता आहे, त्याची माता आहे, मी सर्वाचे बीज आहे. हे तर श्रीकृष्ण सांगतातच, पण या अध्यायात त्यांनी ‘सूत्रे मणिगणा इव’(7) एखाद्या सुतात मणि ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यात ओवलेले आहे असे म्हटले आहे.
या विचारातील उणीव अधिक स्पष्ट करताना ज्ञानेश्वर एक दृष्टांत देतात. सूत म्हटले की ते कापसाचे, लाेकरीचे, रेशमाचे आणि मणी म्हटले की ते साेन्याचे, चांदीचे वा तुळशीचे असू शकतील. म्हणजे सूत व मणी यांच्यांत भेद आला. हा भेद दूर करताना ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, साेन्याचेच मणी सुवर्णाच्या सुतात ओवल्याप्रमाणे एका चित्तत्त्वात सर्व जगास मी धारण केले आहे.सृष्टीचे उत्पन्न हाेणे, ती दिसणे न दिसणे हे सर्व भास माझ्याच ठिकाणी आहेत. अर्जुना, मृगजळ पाहू जाता त्याचे मूळ केवळ सूर्यच असताे, त्याप्रमाणे प्रकृतीने सृष्टी निर्माण केली व ती आवरून घेतली तर त्यात मीच आहे असे ध्यानात ठेव. आतून व बाहेरून सर्व जगतात मीच व्यापून राहिलाे आहे. नामरूपरहित असा मीच आहे.