उत्सवात इतकी माणसे एक विचाराने नाचत-बागडत राहतात हा आनंद काय कमी आहे? आपल्यापुरते विषय भाेगण्याच्या आनंदापेक्षा लाेकांमध्ये आपण मिसळून आनंद भाेगणे हा आनंद वेगळाच खरा. हा आनंद नेहमी आपल्याला टिकवता यावा यासाठी आपण काही करणे जरूर आहे. पन्नासशंभर माणसांनीं एकत्र जमून भजन-पूजन केले की प्रत्येकजण म्हणताे, ‘ार बरे वाटले, आनंद झाला!’ हा आनंद का हाेताे? एकमेकांविषयी आपलेपणा असलेले, एका विचाराचे, सारेजण एकमेकांचे गुणदाेष न पाहता त्यामध्ये रमून जातात.हेच नेहमी आचरणात आणले तर किती गंमत हाेईल! हजाराे माणसांमध्ये आपण एकत्र हाेऊन जर राहिलाे तर आनंद अखंडच टिकून राहील, नाही का?
ही आपली माणसे आहेत म्हणून त्यांच्याबराेबर आपण आनंदात राहताे. तसे, ‘मी भगवंताचा आहे’ म्हटल्यानंतर, सर्व भगवंताची लेकरे आहेत म्हणून आपण नेहमीच आनंदात राहू म्हणून, आकुंचित वृत्ती ठेवू नका, स्वार्थी वृत्ती ठेवू नका.माेठी विशाल वृत्ती ठेवू या. ‘मी भगवंताचा आहे’ असे म्हटल्यावर सर्व जगत् आपल्याला भगवत्स्वरूप दिसू लागेल यात शंका नाही. ही केवळ कल्पना नाही; आपण अनुभव घेऊन पाहत नाही. त्यासाठी नामस्मरणात आपण राहू या.रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे, तर ताे सिद्धमंत्र आहे. ताे भगवंताला आपल्याकडे खेचून आणताे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे. रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्रीशंकरांपासून श्रीसमर्थांच्यापर्यंत जे-जे महासिद्ध हाेऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले.
रामनामाचा साडेतीन काेटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही.सगळ्यांनी असा निश्चय करा की, भगवंताच्या नामापरत्या गाेष्टी ऐकायच्या नाहीत. नाम घेत असताना, जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवा. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका.नामस्मरण साेडू नका आणि आनंदात सर्वजण राहा. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही; परमात्मा सर्व करताे ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की आईबापांची आज्ञा पाळावी, जे करायचे ते मनापासून करावे, प्रामाणिकपणा साेडू नये आणि भगवंताला विसरू नये.