पत्र अठ्ठाविसावे
दरबारांत दामाजी नावाचा एक ब्राह्मण कारकुनी करत हाेता. राेज स्नानसंध्या करून कपाळावर माेठे गंध लावण्याची त्याची प्रथा हाेती. त्याने आपली देहयष्टी मजबूत बनवली हाेती. घाेड्यावर बसण्यात ताे पटाईत हाेता. दांडपट्टा ताे उत्तम खेळत असे. त्याचे माेडी अक्षर माेत्याप्रमाणे हाेते. परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. माझे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे, या भावनेने ताे आपले काम करत असे.बादशहा त्याच्या कामावर खूश झाला व त्याने त्याची नायब तहसीलदार म्हणून नेमणूक केली. दामाजीचा आता दामाजीपंत झाला.दामाजी पंतांची भार्या सावित्रीबाई ही साध्वी पतिव्रता स्त्री हेाती. दामाजीपंतांच्या चरितार्थाची साधने फार त्राेटक आहेत.ज्याप्रमाणे दामाजीपंतांच्या आईवडिलांची विशेष माहिती उपलब्ध नाही, त्याप्रमाणे सावित्रीबाईच्या आईवडिलांची माहिती देखील उपलब्ध नाही.
इ. सन 1450 मध्ये दुसरा अल्लाउद्दीन बादशहा राज्य करत असताना त्याचा भाऊ महंमद याने सैन्य जमवून स्वतंत्र हाेण्याच्या इच्छेने साेलापूर व त्याच्या आसपासचे किल्ले हस्तगत केले. अल्लाउद्दिनने त्याचे पारिपत्य करण्याकरता सैन्य पाठवले व नायब सुभेदाराचे अधिकार देऊन दामाजीपंतांना सैन्याबराेबर पाठवले. या सैन्याने महंमदचा पराभव करून त्याला पिटाळून लावले. मग दामाजीपंतांची नेमणूक मंगळवेढ्यात सुभेदार व तहसीलदार म्हणून झाली.दामाजीपंत मंगळवेढ्यास आल्यापासून दर एकादशीस सपत्नीक पंढरीस जाऊन चंद्रभागेत स्नान करून विठाेबाचे दर्शन घेत असत. मंगळवेढ्यास दामाजीपंताचा वाडा हा महान संतांचा वाडा म्हणून प्रसिद्ध झाला.
गीता सांगणारा यदुनाथ- ताे अनाथांचा -पंढरपुरला विठाेबाच्या रुपाने नटलेला व महाराष्ट्राचा जीव की प्राण झाला. विठाई माऊलीला प्रेमाचा पान्हा फुटताे.दामाजीपंत गाेरगरीबांची सेवा म्हणजे विठाेबाची पूजा असे समजून आपले काम करू लागले व पंढरपुरास मंगळवेढ्यावरून जाणारे वारकरी त्यांचे दर्शन घेऊन मानू लागले कीसंत दामाजीपंतांचे दर्शन। करी आपले जीवन पावन। बिदरचा बादशहा हुमायुनशहा इ.स. 1458 साली गादीवर बसला आणि जिकडे तिकडे जुलमाचा कहर सुरू झाला. त्याने आपल्या भावास वाघाच्या ताेंडी देऊन त्याचा निष्ठुरपणे घात केला. हजाराे लाेकांना हाल हाल करून ठार मारले जात असे. त्यांचे हाल पाहण्यात बादशहाला पराकाष्ठेचा आनंद मिळत असे.गावातील काेणाही माणसाचे लग्न झाले तरी त्याची बायकाे पहिल्या रात्री बादशहाचे रंगमहालात आली पाहिजे, असा बादशहाचा स्नत हुकूम हाेता. अशा स्त्रीला किल्ल्याच्या ‘दुल्हन’ दरवाजाने आत आणावयाचे असा प्रघात हाेता. ताे ‘दुल्हन’ दरवाजा आजही बिदरला नीच कृत्यांचे स्मारक म्हणून उभा आहे.
असल्या जुलमी राजवटीत बिदरपासून सुमारे 125 मैल अंतरावर दामाजीपंत तहसीलदार काम करत हाेते. कर्नल एथेरिज यांनी ‘हिंदुस्थानातील दुष्काळ’ म्हणून पुस्तक लिहिले आहे. त्यावरून असे दिसते की, इ.स. 1458 ते 1460 या साली जाे भयानक दुष्काळ पडला ताेच दुष्काळ दामाजीपंतांच्या चरित्रातील दुष्काळ हाेय.मंगळवेढ्याच्या आसपास दुष्काळाने थैमान मांडले.लाेक भुकेने मरू लागले. तळी विहिरी आटू लागली.चंद्रभागेचे पाणी देखील आटले. पंढरपूरला राेज चारपाचशे माणसे उपासाने मरू लागली. जिकडे तिकडे प्रेतांची दुर्गंधी सुटत असे.आसपासचे लाेक मंगळवेढ्यास येत. दामाजीपंत व त्यांची पत्नी सावित्रीबाई त्यांना आपल्या घरचे धान्य देत.
कितीतरी लाेकांना जेवू घालत.