तैसी दशेची वाट न पाहतां। वयसेचिया गांवा न येतां। बाळपणींच सर्वज्ञता। वरी तयातें ।। 6.453

    23-Nov-2022
Total Views |
 
 

dyaneshwari 
 
श्रीकृष्णांच्या कृपेमुळे अर्जुनाला कर्मयाेगाचे व मनाच्या सामर्थ्यांचे महत्त्व कळले.मन हे स्वभावत: चंचल असल्यामुळे त्याला अभ्यासात गुंतविले की, ते तेथेच स्थिर हाेते. मग त्याला परमात्मा दूर रहात नाही.या मनाचे व याेगाचे महत्त्व असे आहे की, इंद्रादि लाेक शंभर यज्ञ करणाऱ्यांनाही माेठ्या कष्टाने मिळतात, तर कैवल्याची इच्छा करणाऱ्यांना ते सहजच प्राप्त हाेतात; पण माैज अशी की, स्वर्ग भाेगीत असताना मन पूर्णपणे कंटाळते. त्याला हे भाेग परमात्म्याच्या प्राप्तीतील संकटच वाटते.या विवंचनेत असताना ताे याेगी देहत्यागानंतर नव्या काेंभाप्रमाणे चांगल्या कुळात जन्म घेताे.या कुळातील माणसे नीतीने वागत असतात. सत्य बाेलतात. जे पहायचे ते शास्त्रदृष्टीने पाहतात.त्यांच्या कुळात वेद हे जागृत दैवत असते. विहित अशा धर्मांचे आचरण हाेत असते. सारासार-विचार हा या कुळात मुख्य असताे.
 
या कुळात इच्छा मात्र ईश्वरप्राप्तीचीच असते. अशा या कुळात ज्ञानरूपी अग्नीचे अग्निहाेत्र असते. सर्वजण परब्रह्माचे उपासक असतात. अद्वैताच्या सिद्धांतावर त्रैलाेक्याचे राज्य करतात. त्यांचे चित्त नेहमी प्रसन्न असते.अशा या कुळाचे माहात्म्य वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात की, ज्याप्रमाणे सूर्याेदय हाेण्यापूर्वी उजेड पडताे, त्याप्रमाणे याेगी बालवयात असला तरी आत्मज्ञानाचा उदय हाेताे. यासाठी प्राैढदशा प्राप्त हाेण्याची वाट पहावी लागत नाही.वयस्करपणाच्या गावाला जाण्यापूर्वीच त्याला बालपणीच सर्वज्ञता प्राप्त झालेली असते.त्याचे मन सर्व विद्यांनी संपन्न असते. त्याच्या मुखातून आपाेआप शास्त्रे प्रकट हाेतात. याेगी माणसाचे हे वर्णन प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना लागू पडत नाही काय?