म्हणाेनि आपणपां विश्व देखिजे। आणि आपण विश्व हाेईजे। ऐसें साम्यचि एक उपासिजे। पांडवा गा।। 6.409

    21-Nov-2022
Total Views |
 
 

dyaneshwari 
 
या अध्यायातील कर्मयाेग अतिशय सुलभ असा आहे.काम-क्राेध दूर करून इंद्रियांचा निग्रह करावा. मग वैराग्य प्राप्त झाले की, बुद्धी माेठ्या सुखाने धैर्याच्या वाड्यात नांदू लागते.मनाला हळूहळू परमात्ममंदिरात स्थान मिळेल.आत्मप्राप्तीचा हा साेपा मार्ग अर्जुना, ध्यानात घे.पण हाही अवघड वाटत असेल तर दुसरा एक साेपा मार्ग तुला सांगताे. नियमाने मन स्थिर करावे. पण हे मन स्थिर हाेत नसेल तर त्याला भरकटू द्यावे. हे भरकटणे झाल्यावर उनाड मन हळूहळू स्थिर हाेत जाईल आणि आत्मस्वरूपास पाेहाेचेल.या ऐक्याच्या भावनेमुळे त्रैलाेक्य उजळून जाईल.चित्तच चैतन्यमय हाेऊन राहील. मीठ पाण्याला जसे साेडत नाही, तसे मन परमात्म्याला साेडणार नाही.
 
सामरस्याच्या मंदिरात नेहमीच सुखाची दिवाळी साजरी हाेईल. पण अर्जुना, हेही तुला साधत नसेल तर आणखी एक साेपा मार्ग सांगताे. मीच सर्व देहात आहे, या तत्त्वाविषयी भ्रांती मनात धरू नकाेस. मी व हे विश्व एकवटून आहाेत अशी बुद्धी धारण कर. सर्व भूतांत मला समत्वाने पहा.अंत:करणात भेदभाव ठेवू नकाेस. दिवा आणि प्रकाश जसे एकरूप असतात, तसे माझे विश्वाशी एकरूपत्व आहे. वस्त्रांत जसा तंतू तसा मी सर्व भूतांत राहताे.अशा रीतीने सुखदु:खांची भावना, शुभाशुभ कर्में यांची जाणीव न ठेवता सर्वत्र समबुद्धीने म्हणजे आत्मस्वरूप बुद्धीने पहावे. असा पुरुष शरीरधारी असला तरी ताे खराेखरच ब्रह्मस्वरूप असताे म्हणून अर्जुना, असे साम्य अंगी बाणवावे की स्वत:त आपण विश्व पहावे व आपण विश्वरूप हाेऊन जावे.