नाम घेताना मनात एक परमेश्वरच असायला

    18-Nov-2022
Total Views |
 
 
 

Gondavlekar 
खराेखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे.परंतु आपल्या अनुभवावरून पाहिले तर परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न हाेत नाही. आपल्याला परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही, मग ती त्याला ऐकू कशी जाणार? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असताे, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी हाेऊन नामावर प्रेम जडते. बायकाेमुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करताे; मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे; दुसरी काेणतीही वृत्ती उठता कामा नये; तेच खरे नामस्मरण. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत.
 
ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून त्यांना जीवनात याेग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजविता कामा नये.समजा, राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळल आहेत; ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपाेआप शिल्लक राहते; शिवाय, त्यामध्ये बाहेर काढायला जे साेपे आहे ते आपण काढताे; त्याप्रमाणे, घ्यायला साेपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने िंवषय आपाेआप बाजूला पडेल.दाणे निवडून काढताना थाेडासा राजगिरा जरी लागला तरी आपण ताे झाडून टाकताे त्याप्रमाणे, भगवंताच्या अनुसंधानामध्ये नकाे असला तरी थाेडा विषय येणारच, पण ताे हवेपणाने भाेगला नाही तर ताे आपल्याला बाधक हाेणार नाही.
 
सर्व संतांचे सांगणे एकच आहे, आणि ते असे की,‘तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचे ज्ञान हाेईल.’ भगवंताचे अनुसंधान याचा अर्थ असा की, बाकीच्या गाेष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण परमात्म्याचे विस्मरण हाेता कामा नये.
भगवंताचे अनुसंधान काेण कसे ठेवील याचा नेम नाही.काेणी पूजा करून ते ठेवील, काेणी भजन करून ते ठेवील, काेणी नामस्मरण करून ठेवील, काेणी मानसपूजा करून ठेवील, तर काेणी चित्रकलेमध्येसुद्धा ठेवील. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे, आणि त्याला अनुसरून बाकीच्या गाेष्टी आपण करू या. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पाेथ्यांचे सार आहे.