श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील प्रेमाच्या विविध छटा ज्ञानेश्वर वर्णन करतात. याेगासारखा अवघड विषय, कुंडलिनीचे अगम्य माहात्म्य ऐकण्यासाठी श्राेता म्हणून श्रीकृष्णांसमाेर अर्जुन आहे. या ओवीत ज्ञानेश्वर म्हणतात, की आपले श्रवण करण्यासाठी हे एक चांगले ग्राहक लाभले आहे.म्हणून श्रीकृष्णांनी ध्वनितार्थाने बाेलण्याचे साेडून खऱ्या भावार्थाची घडी उलगडून दाखविली आहे.ही कुंडलिनी शक्ती महदाकाशाच्या घरात शिरताच ती आपल्या तेजाचे भाेजन चैतन्यास अर्पण करते. हा भाेजनाचा नैवेद्य झाल्यावर मग द्वैताचे नावही उरत नाही.कुंडलिनीचे तेज संपते. ती प्राणवायूच्या स्वरूपाला येते.
हे रूप कसे असते? तर ज्ञानेश्वर म्हणतात, की ही वायूची पुतळी आतापर्यंत साेनसळा म्हणजे पीतांबर वेढून बसली हाेती. पण आता ते वस्त्र दूर करून उघडी झाली आहे असे वाटते. किंवा वाऱ्याने दिव्याची ज्याेत विझते, आकाशात वीज चमकून जाते, तशी ही साेन्याच्या सरीसारखी दिसणारी, प्रकाशाच्या झऱ्यासारखी वाहणारी हृदयाच्या पाेकळीत एकाएकी विरून जाते.नंतर तिच्यात नाद, कांती, तेज काहीच दिसून येत नाही. अशा अवस्थेत मनाला जिंकणे, वायूला काेंडणे, ध्यान करणे हे काहीच उरत नाही. संकल्प व विकल्पांचे प्रकारही हाेत नाहीत. ही स्थिती म्हणजे पंचमहाभूतांची आटणीच हाेय. या स्थितीच्या साहाय्याने पिंडाने पिंडाला ग्रासणे म्हणजे काय हे नाथसंप्रदायाचे रहस्य ध्यानात येते. परंतु ज्ञानेश्वर म्हणतात की, श्रीकृष्णांनी अर्जुनरूपी ग्राहकापुढे नुसती दिशाच दाखविली आहे. भावार्थाची घडी ते पुढे उलगडताना दिसतात.