भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे

    01-Nov-2022
Total Views |
 
 

Gondavleakr 
 
मनुष्याचा स्वभावच असा असताे की, आपल्याला कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानताे; जाे कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल? जाे ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या ताेकड्या ज्ञानाने कसे अजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडे ताे आहे, तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान हाेणार आहे.अविद्या ती हीच की, आपल्या कल्पनेने हाेणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा; खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके (आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली.
 
कल्पनेच्याही) पलीकडल्या गाेष्टी जर आपल्या य:कश्चित् संसारातसुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे? सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असताे, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे.परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून ताे सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच सर्वांना ताे सुसाध्य असला पाहिजे. एखादा माेठा गणिती हिशाेब लवकर करू शकताे; परंतु खेडेगावांतले अडाणी लाेक गणित न शिकताही हिशाेब बराेबर करतात आणि त्यांचा व्यवहार बराेबर चालताे. तसे, विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त हाेईल, पण अडाणी माणसालादेखील ताे प्राप्त हाेऊ शकेलच.
 
भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंत:करण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करताे. मनुष्य जन्माला आला की, सगळी नाती त्याला आपाेआप येतात, त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरू आहे असे म्हटले की, बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे.जसा मारुतीमध्ये देवअंश हाेता तसाच ताे आपल्यामध्येही आहे. त्याने ताे ुलविला; पण आपण झाकून ताे विझवून टाकला, याला काय करावे? मामलेदाराला बराेबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चाेराला मात्र त्याच्याबराेबर असलेल्या शिपायाची भीती वाटते; त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे. अशी त्याची खात्री असते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.