इच्छित प्राप्तीसाठी धडपड करणारा माणूस शाश्वत प्राप्तीपेक्षा नाशवंत प्राप्तीला जास्त प्राधान्य देताे. मुळात जे शाश्वत आहे तेच त्याला पटत नाही. संसारात अडकलेल्या व देहाला मी समजून बसलेल्या या जीवाला नाशवंत तेच खरे वाटते. त्याचे देहावरील प्रेम, त्याची इंद्रियांची लळे पुरविण्याची इच्छा, त्याच्याकडे असलेला देहाभिमान, अहंकार आदी बाबी त्याला नाशवंत, भाैतिक सुख हेच खरे सुख मानायला लावतात.पण ज्याला देह म्हणजे मी नव्हे किंवा देहाच्या, इंद्रींयांच्या सुखासाठी धडपड करणे याेग्य नव्हे हे पटते, ताे देहात असूनही देहापेक्षा वेगळा हाेताे.
म्हणजेच मीपणा, देहाभिमान, अहंकार, स्वार्थ आदिपासून पूर्णत: मुक्त हाेताे. असा मुक्त झालेला व्यक्ती भाैतिक सुखात अजिबात अडकत नाही. भाैतिक, नाशवंत सुख हे सुख नसून मुळात हेच खरे दु:ख आहे, हे त्याला पटते.थाेडक्यात त्याला स्वत:चा खरा परिचय झालेला असताे. असा स्वत:चा खरा परिचय हाेणारा भक्त अवती-भाेवतीचे नाशवंत सुख तर साेडाच पण इंद्रपद जरी मिळाले तरी त्यालाही ताे उपभाेग न म्हणता एक प्रकारचा राेग म्हणताे. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात इंद्रपदादिक भाेग । भाेग नव्हे ताे भवराेग ।। जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448