या एका महत्त्वाच्या ओवीत ज्ञानेश्वरमहाराज माेक्ष कशात आहे, याचे विवरण करीत आहेत.ज्ञानेश्वर व त्यांचे अनुयायी यांची माेक्षकल्पना अगदी स्वतंत्र आहे.या जगातील सर्व वस्तूंचा त्याग करावयाचा आणि परमात्म्याला जाऊन मिळावयाचे ही रुढ माेक्षकल्पना ज्ञानेश्वर मानीत नाहीत. ज्ञानेश्वरांच्या पूर्वी जीविताचे ध्येय स्वर्ग अथवा माेक्ष मानले गेले हाेते.दवधर्म कशासाठी करावयाचा? तर राेजच्या भाैतिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून देवाची आठवण करावयाची.ही कल्पना ज्ञानेश्वरादि संतांना मान्य नाही. ‘देवाचिया चाडें। देव आळवावा।।’ देवासाठी देवाची प्रार्थना करावी, त्याला आपल्या ऐहिकात गुंतवू नये असे तुकारामांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे भाैतिक सुखे नकाेत, म्हणजे त्यांच्या प्राप्तीसाठी देवाची प्रार्थना नकाे, त्याचप्रमाणे स्वर्गप्राप्तीसाठीही देवाची सेवा करणे बराेबर नाही.
भाैतिक सुखे, स्वर्ग, माेक्ष यांच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरांच्या पूर्वी ईश्वराला सांकडे घातले जात असे. यज्ञयाग, याेगक्रिया सकाम व्रतवैकल्ये यांचाच प्रभाव मनावर हाेता. प्राणायाम करून इंद्रियांना दडपावे, मन मारून टाकावे आणि स्वर्गाची वा माेक्षाची प्राप्ती करून घ्यावी असा रिवाज हाेता.पण ज्ञानेश्वरांनी वरील कल्पना दूर सारली आणि माेक्ष लाेकांच्यासमाेर आणून उभा केला.माेक्षासाठी शरीरत्यागाची वा शरीरकष्टाची जरूरी नाही. याेगध्यानाची जरूरी नाही. सकाम व्रतांची जरुरी नाही. इंद्रियांना दु:ख देण्याची जरूरी नाही. असे सांगून ज्ञानेश्वर म्हणतात की, केवळ भगवंताचे गुणगान श्रवण केल्यानेच माेक्षसुखाची प्राप्ती हाेते. म्हणून ज्ञानेश्वरी हा वाचण्यापेक्षा श्रवण करण्याचा ग्रंथ आहे.