या समासाचा हेतूच मुळी जन्मदु:खाचे निरूपण करण्याचा आहे त्यामुळे श्रीसमर्थ देहाची जडणघडण कशी हाेते आणि पुढे देह कसा अमंगळ आहे हे विविध उदाहरणे देऊन श्राेत्यांच्या मनावर ठसविण्याचा आग्रह धरीत आहेत. ते म्हणतात की, जन्माला आपण आनंददायी व सुमंगल म्हणताे खरे; पण त्याचे मूळ पाहिले तर ते स्त्री व पुरुष शरीरातील विटाळात आहे हे सुस्पष्ट आहे. वरवर पाहिले तर शरीर गाेंडस दिसते; परंतु आत डाेकावून पाहिले तर त्या शरीरामध्येच असंख्य दुर्गंधमूलक दाेष आढळतात. त्यांचा जर मागाेवा घेतला तर शरीर म्हणजे जणू नरकाच्या कातड्यात बांधलेले पाेतडे किंवा कुंड आहे हे लक्षात येईल.मात्र दुर्गंधीचे कुंड धुवून तरी स्वच्छ करता येते; पण शरीरामध्ये राेज नवीन मळ साठतच जाताे त्यामुळे ते संपूर्ण शुद्ध करणे अश्नयच असते.
शरीराबद्दल तिरस्कार उत्पन्न हाेण्यासाठी श्रीसमर्थ प्रत्येक अवयव आणि त्यात हाेणारे राेग हे सुद्धा सविस्तरपणे सांगतात.डाेळ्यात चिपाडे, नाकात मेकडे, कानात मळ, मुखात लाळ, छातीत कफ अशी अवस्था असणाऱ्याच्या ताेंडाला कवी मंडळी चंद्रासारखे देखणे मुखकमल कसे म्हणतात हेही ते उपहासाने विचारतात. ताेंडात अशी घाण तर पाेटामध्ये विष्ठा हीही वस्तुस्थितीच असते. कितीही पंचपक्कान्नांचे सुग्रास भाेजन केले तरी त्यापासून विष्ठाच तयार हाेते आणि पवित्र अशा गंगामाईचे पाणी तीर्थ म्हणून घेतले तरी त्याचा काही भाग मूत्ररूपाने शरीर बाहेर टाकते.त्यामुळे अन्नापैकी काहीचे पचन आणि बाकीचे मलमूत्र विरेचन हे सत्य लक्षात घ्यावे. कारण या राेजच्या दिनक्रमानेच शरीराची वाढ हाेत असते.