जन्म लाेभाचे कमळ। जन्म शाेकाचा सागर ।।1।।

    13-Oct-2022
Total Views |
 
 

saint 
 
श्रीमत् दासबाेधाचा पहिला दशक स्तवनाचा, दुसरा गुणलक्षणाचा झाल्यानंतर आता तिसरा दशक स्वगुणपरीक्षेचा आहे.या दशकामध्ये श्रीसमर्थांनी माणूस जन्माला आल्यापासून मृत्यू पावेपर्यंत त्याचे जीवन कसे चालते, याचे सखाेल वर्णन केले आहे. प्रपंच उत्तम करावा अशी जरी त्यांची शिकवण असली तरी मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय देहाेपभाेगापासून मुक्त हाेऊन आत्मप्रचिती येणे असले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. त्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी ऐहिक जीवन वरकरणी जरी सुखाचे वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते कसे दु:खाचेच आहे व खरे सुख जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटून ब्रह्मज्ञानी हाेण्यातच आहे, हे ते स्पष्ट करून सांगत आहेत. यातील पहिला समास जन्मदु:ख निरूपण हा आहे. श्रीसमर्थ म्हणतात की, पुढे सतत वाढत जाणाऱ्या दु:खरूपी वृक्षाचा जन्म हा अंकुर आहे. काेणताही अंकुर इवलासा असताे व ताेच पुढे वर्धिष्णु हाेऊन त्याचा प्रचंड वृक्ष बनताे.
 
अगदी त्याचप्रमाणे इवलेसे बाळ जन्माला येते आणि पुढे 50-60-80 वर्षांपर्यंत संपूर्ण आयुष्य अंतिमत: दु:खरूपच जगते.हसूंमागे आसू येती। सुखामागे तसे दु:ख। यशापाठी अपयश। प्राणिजन्माचे संचित- (आनंदी) याप्रमाणेच आपले आयुष्य जात असते. समुद्र जसा सदैव भरलेलाच असताे; तसेच माणसाला आयुष्यभर काेणते ना काेणते दु:ख मनांत भरलेलेच राहते. मनुष्यजन्म आणि काळजी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे माणूस सतत काेणत्या ना काेणत्या भीतीच्या छायेखाली झाकाेळलेला असताे. रस्त्याने निघालाे तर अपघाताची भीती, कधी मधुमेहाची, तर कधी कॅन्सरची भीती. भीतीचे काहीच कारण नसले तर आहे हे नीट चालेल ना ही भीती पाठीमागे लागतेच. म्हणूनच श्रीसमर्थ जन्माला भयाचा डाेंगर म्हणतात आणि शिवाय ताे कधीच हलतही नाही मग नष्ट हाेण्याची तर बातच नकाे.