नकाे भाेंवताले जगीं । पाहाें जवळी राख अंगीं ।।1।।

    10-Oct-2022
Total Views |
 
 


saint
 
आपण चांगले व्हावे, लाेकांनी आपणाला चांगले म्हणावे असे जवळपास सर्वांनाच वाटत असते. केवळ वाटण्याने माणूस चांगला हाेत नाही. चांगले हाेण्यासाठी जसे दुसऱ्याकडून काही चांगल्या गाेष्टी स्वीकाराव्या लागतात, तसे आपल्यातील काही दुर्गुणही टाकावे लागतात. आपल्यात कसलाच दुर्गुण नाही, असे वाटणे म्हणजे एक प्रकारची चूक करणे हाेय. खराेखरच आपल्यात एकही दुर्गूण नसेल तर फारच छान. पण थाेडासाही दुर्गूण, उणीव असेल तर त्याकडे लक्ष द्यावेच लागेल. आपल्यात चांगुलपणा निर्माण हाेण्यासाठी व ताे टिकविण्यासाठी आपल्याजवळ कसल्याही वाईट गाेष्टी येऊ नयेत, म्हणून केवळ आवतीभाेवती पाहून चालत नाही. तर प्रथमत: आपण आपल्यातील दाेष, उणिवा पाहणे आवश्यक असते.
 
आपल्याकडे सर्व काही चांगले आहे पण कळत न कळत थाेडा फार क्राेध असेल तर त्याला प्रथमत: नष्ट करावे. अन्यथा सगळ्या चांगुलपणाची ताे राखरांगाेळी केल्याशिवाय राहणार नाही.या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, नकाे भाेंवताले जगी। पाहाें जवळी राख अंगी।। अग्नीने जळालेले दिसते, तसेच ते विझवता तरी येते.पण क्राेधाने जळणारे दिसतही नाही आणि सहजपणे ते विझवताही येत नाही, हे लक्षात असावे. जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448