आकाशमार्गे गाई खराेखर उडत येत हाेत्या का ..

    13-Sep-2021   
Total Views |

गाय हा काही आकाशातून उडत येणारा प्राणी नाही, तरीही स्वित्झर्लंडच्या क्लाॅसेन्पस भागातील नागरिकांना एका पाठाेपाठ दहा गाई आकाशातून उडत येताना दिसल्या. (भाग : 1502)
 
 

cow_1  H x W: 0 
 
अलीकडे साेशल मीडिया हा जवळजवळ प्रत्येकाच्या हातचे साधन असल्याने त्याचे व्हिडिओ फेसबुक, व्हाॅट्सअ‍ॅपवर साऱ्या युराेपात प्रत्येकापर्यंत पाेहाेचले. प्रत्यक्षात त्या आकाशमार्गे उडत येणाऱ्या गाई नव्हत्या, तर डाेंगरावर जखमी झालेल्या गाई त्याच्या मालकाने हेलिकाॅप्टरच्या साहाय्याने उचलून पशू दवाखान्यात आणल्या हाेत्या. हेलिकाॅप्टर जेव्हा जिवंत प्राणी उचलते तेव्हा ते फार खाली न उतरता माेठ्या दाेरीला लावलेल्या जाळीच्या आधारे ते प्राणी उचलते. कारण गाईसारख्या प्राण्याला हेलिकाॅप्टरचा वारा सहन हाेणेच शक्य नसते. त्यामुळे गाय आणि हेलिकाॅप्टर यातील अंतर अधिक असल्याने प्रथमदर्शनी आकाशातून गाई उडत आहेत, असे वाटू शकते. वास्तविक यातील अधाेरेखित बाब अशी की, गाईंच्या प्रकृतीसाठी त्यांना डाेंगरावरून खाली हेलिकाॅप्टरने आणणे, याबाबत शेतकऱ्यात असलेली जागरूकता.आपल्याकडे गाय आजारी पडली किंवा जखमी झाली, तर लगेच हेलिकाॅप्टर मागविले जाण्याची आर्थिक सुबत्ता नाही, तरीही आपल्या जनावरांना लगेच उपचार केला जाताे का, हा यातील लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.
 
जनावरांना काही झाले, तर लगेच काळजी घेणारी अनेक कुटुंबे आहेत; पण एकूण स्थिती दुर्लक्षाचीच आहे. आपण आपल्या घरात आपल्यासाठीही काही झाले, तर त्वरित औषधांची पेटी म्हणजे फर्स्ट एड बाॅक्स ठेवलेली नसते; पण त्याची किंमत आपल्यालाच चुकवावी लागते. येणारा काळ हा जनावरांना महत्त्व देण्याचा आहे. गाय हा फक्त दूध देणारा किंवा मांसाहारींच्या बाबतीत त्यासाठी उपयाेगात आणायचा प्राणी राहिलेला नाही. त्याचे उपयाेग क्षेत्र वाढते आहे. येणाऱ्या काळात गाेवंश हा एवढ्या महत्त्वाचा प्राणी बनण्याची शक्यता आहे की, हेलिकाॅप्टरने गाईला खाली आणण्याऐवजी डाॅक्टरला हेलिकाॅप्टरने गाेवंश असेल त्याठिकाणी जावे लागेल.स्वित्झर्लंडमध्ये गाईसाठी हेलिकाॅप्टरच्या दहा खेपा झाल्याची घटना घडली आहे, जगामध्ये सर्वत्र एवढी जाणीव आहे असे नाही. जगातील सत्तर टक्के जनावरे ही मांसासाठीच पाळलेली असतात.त्यांचे हाल तर अतिप्रचंड हाेत असतात.तरीही त्याकडे बघण्याचा आपण जाे दृष्टिकाेन ठेवू त्यावर जनावरांचाही प्रतिसाद अवलंबून असताे.