दिवसेंदिवस देशी गाईचे संगाेपन करण्याचे प्रमाण वाढते आहे.सध्या त्याचा विचार फक्त ‘दुधाचा व्यवसाय’ या दृष्टिकाेनातून हाेत आहे.(भाग : 1485)
वास्तविक आर्थिक फायद्याच्या परिभाषेत बाेलायचे झाले, तर अधिकाधिक दूध देणाऱ्या गाईकडून हाेणाऱ्या प्राप्तीपेक्षाही गाेमूत्र आणि शेण यापासून अनुक्रमे गाेआधारित शेती आणि औषधे यातून हाेणारी प्राप्ती किमान पंचवीस ते पन्नासपट अधिक आहे.
अवघ्या दहा किलाे शेणात एक एकर शेती हा त्याचा पाया आहे, तरीही ताे विषय नीट समजून घेतला पाहिजे. एका गाईकडून जर दूध, शेण आणि गाेमूत्र यांतील प्रत्येक कण आणि प्रत्येक थेंबाचा जर उपयाेग करून घ्यायचा असेल, तर गाईची प्रकृती नीट हवी. नीट प्रकृतीसाठी आजार, औषधे, त्यातील जाणकार व्यक्तीचे मार्गदर्शन हे तर महत्त्वाचे घटक आहेतच; पण त्याही पेक्षा महत्त्वाच म्हणजे चारा आणि पाणी नीट हवे. एका गाईच्या किंवा बैलाच्या आधारे तीस एकर जमिनीवरील बागाईत शेतीही हाेते आणि पन्नास कुटुंबांना लागणारी सारी औषधे तयार हाेतात. या जशा जमेच्या बाजू आहेत, त्याप्रमाणे गाईंचा चारा, पाणी यांचा विचार हाेणे आवश्यक आहे.
जगात जागतिक पातळीवर ‘जनावरांचा चारा’ यावर संशाेधन करणाऱ्या विद्यापीठांची आणि संशाेधन संस्थांची संख्या शंभराहून अधिक आहे. भारतात फक्त उत्तर प्रदेशात झांसी येथे जनावरांच्या चाऱ्यावर केंद्रीय संशाेधन संस्था आहे. ती संस्था अनेक प्रकल्पांवर काम करत आहे; पण भारतासारख्या कृषिप्रधान देशात प्रत्येक राज्यात दाेन ते तीन संस्था असणे आवश्यक आहे.आपल्याकडे म्हणजे उष्ण कटिबंधात वापरल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या गवताला नॅपिअर ग्रास, एलिंट ग्रास किंवा युगांडा ग्रास म्हणायची पद्धत आहे. माणसाच्या भाेजनात जेवढे भात, पाेळी, भाकरी यांना महत्त्व आहे तेवढे जनावरांच्या ओल्या चाऱ्याला महत्त्व आहे. गाई, म्हशी, बैल यांना पेंड घालणे, शिवाय काही महत्त्वपूर्ण आंबवण घालणे हे आपल्याकडे हाेत असते. गाईने दूध अधिक द्यावे म्हणून कांही कंपन्यांच्या गाेळ्या देणे यापेक्षा हिरवा चारा, चांगली वैरण आणि त्यातही त्यांना माेकळ्या रानावर भटकू देणे याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे घरात एखाद्या अठरा इंच बाय छत्तीस इंच ट्रेमध्ये मक्याचा काेवळा चारा तयार करण्यापासून ते भरपूर प्रथिने असणाऱ्या वीस फुट वाढणाऱ्या, वर्षाला चारवेळा कापणी करता येणाऱ्या नेपियर चाऱ्याची माहिती आपण समजावून घेतली पाहिजे.