‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्’ ही बाब माणसासाठीही महत्त्वाची आहे आणि जनावरांसाठीही महत्त्वाची आहे. त्याचा वापर वाढता ठेवल्यास आराेग्याच्या अनेक समस्या सुटतील.
(भाग : 1478)
काही दिवसांपूर्वी मी एका माझ्या मित्राच्या गाईच्या गाेठ्याला भेट दिली.तेथे चाेवीस गाई हाेत्या; पण फक्त तीन गाई दूध देणाऱ्या हाेत्या. त्या गाई सांभाळणे परवडत नाही, अशी त्याची अडचण हाेतीच. याचे कारण मला असे दिसले की, बहुतेक गाईंच्या स्तनांना सूज असण्याची व्याधी झाली हाेती. हा प्रकार त्याने आयुर्वेद तज्ज्ञ पशुवैद्याला दाखवला असता, तर लवकर बरा झाला असता.आम्ही त्यासाठी काेरफड, जिरे आणि बाजरी यांचा वापर करताे. सध्या ज्याला प्रगत पशुविज्ञान म्हणतात त्यात अॅण्टिबायाेटिक्स किंवा कधी कधी स्टेराॅईडही देतात. बऱ्याच वेळा गाेठेवाला श्रीमंत असेल, तर महागडी औषधे दिली जातात. त्यावरील रामबाण उपाय म्हणजे आयुर्वेद पशुवैद्याच्या संपर्कात असणे आणि स्वत: त्यावरील पुस्तके वाचून जाणकारांच्या सल्ल्याने उपचार करणे.यातील अजून काही बाबी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक म्हणजे आपणही आपल्या जेवणात चाैरस आहार गृहीत धरताे. अनेक औषधांची व्यवस्था आपल्या जेवणातच केलेली असते.सुंठ, हळद या बाबी आवश्यक आहेत.
आपल्या घरात जेव्हा सून येते तेव्हा हळदीच्या कार्यक्रमाला महत्त्व असते.त्याचप्रमाणे तिच्याबराेबर सुंठवडा येत असताे. हळद ही कृमीनाशक आहे, हळद मधुमेह नियंत्रणात ठेवते. कॅन्सर हाेऊ नये, अशी क्षमता हळदीत आहे. जी बाब घरात येणाऱ्या नववधूची असते, तीच बाब गाईचीही असते. पन्नास टक्के जनावरांना अॅनिमिया म्हणजे रक्तातील लाेहाचे प्रमाण कमी असणे. ही समस्या पन्नास टक्के माणसांबाबतही असते आणि पन्नास टक्के प्राण्यांबाबतही असते. डाॅक्टर-वैद्यांना दाखवणे हे तर त्यासाठी याेग्यच असते; पण नियमितपणे सुंठ, गुळवेल हे त्यावर परिणामकारक उपाय आहेत. त्यातही लिंबाच्या झाडावर आलेली गुळवेल ही अधिक प्रभावी असते.सर्वसाधारणपणे आपण गाईकडे जेवढे लक्ष देताे तेवढे लक्ष बैलाच्या प्रकृतीकडे देत नाही. पण, त्यालाही हे सारे नियम लागू हाेतात. सुंठ ही शुक्रधातूवर्धक आहे.लिव्हर, किडनी यांनाही हे सारे पाेषक आहे.