डाॅ. संताेष गटणे हे काही वर्षे संघप्रचारक हाेते, त्याआधी त्यांनी आयुर्वेदाचा पदवी अभ्यास पूर्ण केला हाेता. गाेविज्ञान संशाेधन संस्था आणि गाेसेवा विभाग यांच्या वेबनारवरील भाषणात त्यांनी माहिती सांगितली की, गाईला आपण नकळत चुकीची वागणूक देताे. याची अनेक उदाहरणे सांगितली. (भाग : 1477)
ते म्हणाले, देशात गाेवंशाचे रक्षण झाले पाहिजे, या चांगल्या हेतूने अनेकांनी माेठमाेठे गाेठे उभे केले. त्यांतील कांहींचा चांगला अभ्यास हाेता; पण अभ्यास नसताना केवळ गाेमातेचे प्रेम यासाठी ज्यांनी गाेशाळा उभ्या केल्या, त्यांना त्या गाेशाळा अल्प काळात बंद कराव्या लागल्या. माझ्याच एका मित्राने केवळ गाेभक्तीसाठी तीस लाख रुपये खर्च करून गाई खरेदी केल्या. पण, त्यांच्या सवयी, त्यांचे नेमके खाणेपिणे, त्यांच्या व्याधी यांची माहिती नसल्याने ती गाेशाळा त्याला बंद करावी लागली. काेणतीही गाय अन्य गाईचे साेडाच; पण आपल्या वासराचेही उष्टे पाणी पीत नाही.वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास उष्टे खाल्ल्याने मेंदूचे आजार हाेतात. माणसाचीही हीच स्थिती आहे; पण माणसाला हे शास्त्र माहीत असूनही प्रत्यक्षात समाजात काय आहे हे आपण बघताे. पण, जनावरांनी मात्र हा विधिनिषेध आपणहून सांभाळला आहे. माणसाच्या आराेग्याएवढेच जनावरांचे आराेग्यही महत्त्वाचे आहे.
ज्या देशी गाईच्या आधारे आपण अनेक बदल अपेक्षित करत आहाेत, त्यांचे आराेग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे.ते म्हणाले, ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्’ हे आयुर्वेदाचे उद्दिष्ट आहे.गाईबाबत विचार करता आपण गाईलाच चुकीच्या सवयी लावताे. उदाहरणच द्यायचे झाले, तर वसुबारस हा जाे गाईच्या आणि वासराच्या पूजेचा दिवस असताे, त्या दिवशी आपण माेठ्या भक्तिभावाने गाईला पुरणाची पाेळी भरवताे.एका चाैकात त्या दिवशी पूजेसाठी उभ्या केलेल्या गाईला येवढ्या पुरणपाेळ्या भरवल्या गेल्या की, त्या गाईचे पाेट फुगून ती गाय कांही दिवसात मेली.यातील लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे गाईला कधीही शिजलेले आणि शिळे अन्न घालायचे नाही. आपल्याकडे आपल्या जेवणातील पहिला घास गाईला म्हणजे ‘गाेग्रास’ देण्याची पद्धती आहे.ताेही फक्त एकच घास असावा.