देशी आणि विदेशी जनावरे यांच्यावर दीर्घकाळीन समस्या निर्माण झालेले गाजरगवत, विदेशी खते आणि जनावरांचे संकरीत वाण यांच्या प्रचारासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र ‘बीडीओ’ नेमून त्याचा प्रचार व वाटप केले जायचे. या नव्या याेजनेमुळे गाजरगवताकडे लक्ष द्यायला काेणालाही वेळ नव्हता. (भाग : 1475)
त्या गाजर गवताच्या परिणामावर अनेक देशांनी संशाेधन केले. त्यांचा निष्कर्ष असा आहे की, या गवताने केवळ अन्य पिके आणि जनावरांनाचीच हानी झाली, असे नव्हे, तर जमिनीची मातीही बिघडत गेली, ती समस्या आजही आहे. गेल्या साठ वर्षांत भारतात किंवा महाराष्ट्रात त्याचा किती विपरीत परिणाम झाला आहे, याचा अभ्यास करावा लागेल.सकृतदर्शनी विचार करता या देशात रासायनिक खते आणि युराेपात बंदी असलेली अतिउग्र अशी अॅलाेपॅथीची औषधे यांचा परिणाम या देशावर एखाद्या महायुद्धात जसे नुकसान हाेते, तसा झालेला आहे.पारंपरिक युद्ध किंवा महायुद्ध यांचे परिणाम अनेक वर्षे राहतात आणि निस्तरायला तर अजून अधिक वर्षे लागतात; पण गाजरगवत, युराेप अमेरिकेत बंदी घातलेली औषधे हे तर पन्नास साठ वर्षे चाललेले आक्रमण आहे. त्याचा सामना लांब पल्ल्याचा कार्यक्रम समाेर ठेवून करावा लागणार आहे. अर्थातच त्याचा सामना करण्याचे सामर्थ्य आयुर्वेद, गाेआधारित शेती आणि आणि पारंपरिक पशुचिकित्सा यामध्ये आहे.
रासायनिक खतांची समस्या, उग्र औषधांच्या समस्या आणि गाजरगवताच्या समस्या या देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि मातीच्या प्रत्येक घटकापर्यंत पाेहाेचल्या आहेत. त्यात सामान्य माणसाचा सहभाग हाच प्रमुख घटक असणार आहे. अर्थात याचेही अनेक विभाग असणार आहेत. प्रत्यक्ष युद्धात शत्रू देशाने एखादी चढाई केल्याचे लक्षात येताच त्याला प्रत्युत्तर म्हणून त्वरित काही कारवाई करावी लागते; पण या साठ वर्षे सुरू असणाऱ्या युद्धात प्रत्येक बाब ही अतिशय सुनियाेजित व अभ्यासपूर्ण पद्धतीने करावी लागणार आहे. याचे महत्त्वाचे कारण त्यातील बहुतेक बाबी या अनेक वर्षे सवयीच्या झाल्या आहेत.त्या संघटितपणेही करता येतील आणि व्यक्तिगत पातळीवरही करता येतील.त्याचे स्वरूप एका क्षेपणास्त्राला दुसऱ्या क्षेपणास्त्राने उत्तर असा प्रकार नाही.जनावरांच्या दुधाची चव बदलली, त्याचे कारण शाेधणे व त्यावर उपाय करणे, असे छाेटे छाेटे मार्ग राहतील.