आंतरराष्ट्रीय दूध दिवस हा दि. 1 जूनराेजी जगभर साजरा केला जाताे, तर भारतात राष्ट्रीय दूध दिवस दि.26 नाेव्हेंबरला साजरा केला जाताे.(भाग : 1441)
भारतात गुजरातमधील अमूल महाप्रकल्पाच्या वाढीत महत्त्वाची भूमिका असलेले वर्गिस कुरियन यांचा जन्मदिवस दि. 26 नाेव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केला जाताे. कुरियन यांनी दूध व्यवसायात जाे माेठा फरक करून दाखवला, त्यामुळे देशाच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जाेड व्यवसाय मिळाला.अर्थात त्यांची माेठी भूमिका असलेला अमूल प्रकल्प हा गुजरातमधील हाेता.
आजूबाजूच्या राज्यांतूनही त्यात दूध येत असे; पण त्याचे प्रमाण मर्यादित असे.भारतातील दूध आणि दूध उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या कामामुळेच दूध व्यवसायाला माेठ्या प्रतिष्ठित उद्याेगाचा कार्पाेरेट कंपनीचा दर्जा मिळाला. भारतात किमान शंभर तरी असे दूध उत्पादक संघ आहेत की, त्यांनी अमूलचे माॅडेल समाेर ठेवून आपले संघ चालवले. त्या संघांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे यशही मिळाले.गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल आणि त्रिभुवनदास पटेल यांनी पाया राेवलेला हा उद्याेग कुरियन यांच्याच काळात बत्तीस लाख शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास देणारा ठरला. त्या काळीच त्यांचे एक काेटी लिटर दूध जमा हाेत असे.
शेतकऱ्यांनी एका गायीपासून ते शंभर दाेनशे पर्यंत गायी पाळल्या. या साऱ्या उलाढालीला एक मर्यादा हाेती. ती म्हणजे त्या साऱ्या गाई या विदेशी किंवा संकरीत विदेशी हाेत्या.नरेंद्र माेदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी देशी गायीच्या दुधाचा आग्रह धरला आणि त्याचा समावेशही करण्यात आला. पण, शेतकऱ्यांनाच विदेशी गायींची सवय लागल्याने लगेच फरक पडू शकला नाही. तरीही ताे विभाग सुरू झाला. माेदी पंतप्रधान झाल्यावर इ.सन 2016 मध्ये कांकरेज गायीचे स्वतंत्र ए 2 दूध मिळू लागले. कुरियन यांच्या काळातच जर देशी गायींच्या दुधाला प्राधान्य मिळाले असते, तर तेथील दूध व्यवसायाबराेब गाेआधारित शेतीलाही गती मिळाली असती. हाेल्स्टन आणि जर्सी या गायीच्या बराेबरीने दूध देणाऱ्या गीर, कांकरेज, साहिवाल, देवणी गुजरातमध्येही हाेत्या. गाेआधारित शेतीचा प्रचार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तेव्हाही गुजरातमध्ये हाेत्या. एका देशी गायीच्या शेणाने त्या काळी दहा एकर शेती हाेत असे. आता ती तीस एकरपर्यंत हाेते.जर्सी, हाेल्स्टन संकरीत गायीच्या शेणाने अशी शेती हाेत नाही.