दूध न देणाऱ्या गाईच्या शेणातून आणि गाेमूत्रातून पंचवीस पंचवीस एकराची सेंद्रिय शेती हाेऊ शकते, हे तंत्रज्ञान आजपर्यंत काेठे हाेते, असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहात नाही. (भाग : 1373
अगदी पाच-सहा वर्षापर्यंत गाईचा परिचय हा प्रामुख्याने गाेमाता असा हाेता. गाईच्या दुधाची महती घराेघर हाेती. आयुर्वेद शास्त्रातही अनेक औषधे गाेमूत्रात केली जायची. गाईच्या शेणाचे खत करता यायचे, हेही प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असायचे. पण ती बाब अन्य दूध देणाऱ्या प्राण्याबाबतही असायची. गाईच्या किंवा गाेवंशाच्या अवघ्या दहा-दहा किलाे व लिटर शेणाच्या आणि गाेमूत्राच्या आधारे अनेक एकर शेती अगदी बागाईत शेतीही करता येते हा प्रकार मात्र फारसा परिचित नव्हता. आज देशात हे प्रयाेग आणि प्रकल्प सुरू झाले आहेत. ते प्रकल्प आणि प्रयाेग काेठे काेठे सुरू आहेत, याची आपण माहिती घेणारच आहाेत. पण दूध न देणाऱ्या गाईच्या शेणातून आणि गाेमूत्रातून पंचवीस पंचवीस एकराची सेंद्रिय शेती हाेऊ शकते, हे तंत्रज्ञान आजपर्यंत काेठे हाेते, असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहात नाही.
यातील किलाे आणि लिटर ही परिभाषा सध्याच्या काळातील आहे, पण याबाबत अनेक संदर्भ देणारा जुना ग्रंथ म्हणजे पराशर ऋषींची कृषिसंहिता.त्यावर देशात अनेक ठिकाणी भाष्यग्रंथ झाले आहेत आणि त्यात अल्प शेण आणि अल्प गाेमूत्र यांच्या आधारे सुपीक शेती करता येते, याची अनेक उदाहरणे आहेत. त्या तंत्राच्या आधारेच अवघ्या दहा किलाे शेणात शेती केल्याची व्यापक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या पिढीतील एक अभ्यासक माेहनराव देशपांडे यांनी गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रातील दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ही पद्धतीत आत्मसात करून दिली आहे. त्याच्या आधारे आज महाराष्ट्रात बहुदा प्रत्येक गावी ही शेती करणाऱ्यांची संख्या पंचवीस तीस तर असतेच. अनेक गावे ती पद्धत पूर्णपणे आत्मसात करत आहेत.
या विषयाला वाहून घेतलेली गाेविज्ञान संशाेधन संस्था, पुणे यांनी गेल्या पाच वर्षात दहा गावांत अमृतपाणी पद्धतीने शंभर टक्के शेती सुरू केली आहे. या विषयावर माेहनराव देशपांडे यांचे ऋषिकृषी नावाचे शेतकऱ्यांशी संवाद करणारे हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतील पुस्तकही आहे. शेतात पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया, प्रत्यक्ष अमृतपाणी यांचा वापर आणि नंतर दर आठवड्याला पिकावर शंभर लिटर पाण्यात एक लिटर गाेमूत्र घालून त्याची एक एकर पिकावर फवारणी असा त्याचा क्रम आहे. त्यामुळे कमी पाऊस आणि जादा पाऊस या दुष्काळाच्या दाेन्ही शक्यतातून मार्ग निघताे, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855