पूर्ण भाव पाहून ताे संतुष्ट हाेताे व कृपाप्रसाद देताे. हेच या चमत्काराचे स्वरूप आहे हे लक्षात घेऊन अन्य कल्पना व कुतर्क हा व्यर्थ खटाटाेप आहे असेही श्रीसमर्थ बजावतात आणि संत हे देहातीत असतात हा बाेधही करतात. संतांचे असे अलाैकिक सामर्थ्य असण्याचे कारण त्यांनी आचरण केलेला पुण्यमार्ग आहे. तेव्हा साधकानेही त्याच मार्गाने वाट चालली तरी ताेही पुण्यरूप हाेईल. ही वाटचाल कशी करावी याचे मार्गदर्शन करताना श्रीसमर्थ सांगतात की, नामस्मरण, तीर्थक्षेत्रयात्रा कराव्यात आणि विवेक व वैराग्य यांच्या बळावर आसक्ती साेडून हरिचिंतनी मन दृढ करावे. एकाग्रचित्ताने परमात्म्याचे चिंतन करावे आणि ज्ञानम ार्ग व भक्तीमार्ग दाेहाेंचाही संगम साधावा.
एक गुरू, एक देव अशी काेणा एकावर पूर्ण निष्ठा ठेवावी आणि त्याला संशयरहितपणे शरण जावे. यामध्ये प्रगती हाेऊन निर्गुण ब्रह्माचे ज्ञान झाले तरी ते स्थिर हाेण्यासाठी सगुणभक्ती आवश्यकच आहे. निर्गुण हाती आले म्हणून सगुण साेडून दिले तर दाेन्ही निसटून जाण्याचा धाेका असताे. त्यामुळे मग अशाची धड ना इकडे ना धड तिकडे अशी अवस्था हाेऊन पुन्हा अभिमान बळावून साधलेले गमावण्याचा प्रसंग येईल. त्यामुळे सगुणभजन साेडले तर अपयश पदरात पडेल, असा इशारा देऊन श्रीसमर्थ सर्वच साधकांनी सदैव सगुणभजन करावे असे सांगतात!
- अरुण गाेडबाेले, माे. 982201629