जैविक शेती ही शेतकऱ्याला परवडणारीच हवी

    10-Apr-2021   
Total Views |
जैविक शेती ही कमीत कमी उत्पादन खर्चात केली, तरच ती अधिक चांगली हाेईल व अधिक भाव देणारी ठरेल. भारतात आज गाेआधारित शेतीचे प्रशिक्षण देणाऱ्या शंभराहून अधिक संस्था आहेत.
 
x_1  H x W: 0 x
 
येणाऱ्या काळात शेती हा सर्वात महत्त्वाचा उद्याेग हाेणार आहे. कारण संशाेधन आणि तंत्रज्ञान यांनी जगातील बहुतेक क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. शेती हे क्षेत्र असे आहे की, त्याची आवश्यकता कायमच वाढणार आहे. पण, आजपर्यंतची स्थिती अशी हाेती की, शेतकरी त्यांच्या पद्धतीने शेती पिकवत हाेते आणि त्यांच्याकडून भाव पाडून माल खरेदी करता येत हाेता. पण, आता काळ बदलू लागला आहे. शेती क्षेत्र कमी व्हायला लागले आहे आणि खाणाऱ्यांची ताेंडे वाढू लागली आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न ही महत्त्वाची बाब हाेऊन बसली आहे. त्यामुळे प्रगत शेती ही महत्त्वाची बाब झाली आहे.दुसऱ्या बाजूला रासायनिक खतांच्या शेतीचे दुष्परिणामही जगाने पाहिले आहेत.जगातील जे आघाडीचे देश आहेत, ते रासायनिक खते वापरलेली कृषिउत्पादने त्यांच्या त्यांच्या देशात येऊच देत नाहीत.प्रथम त्या शेतकऱ्यावर बंदी घालतात.नंतर त्या कंपनीवर बंदी घालतात आणि नंतर त्या देशातील आयातीवर बंदी घालतात. त्यामुळे देशातील किंवा जगातील आघाडीची बाजारपेठ मिळवायची असेल तर जैविक शेती ही अपरिहार्य आहे. यातील एक बाब स्पष्ट आहे की, रासायनिक खताच्या शेतीपेक्षा जैविक शेतीला थाेडी अधिक मेहेनत घ्यावी लागते. पण, त्याला भावही चांगला मिळत असल्याने ते जादाचे परिश्रम वाया जात नाहीत.या विषयाला अजून एक पैलू आहे.ताे म्हणजे जैविक शेती ही कमीत कमी उत्पादन खर्चात केली, तरच ती अधिक चांगली हाेईल व अधिक भाव देणारी ठरेल. भारतात आज गाेआधारित शेतीचे प्रशिक्षण देणाऱ्या शंभराहून अधिक संस्था आहेत. त्या प्रत्येकाची पद्धती अभ्यासून बघितली पाहिजे. याच आठवड्यात माेरादाबाद येथे साठ शेतकऱ्यासांठी एक आठवड्यात अभ्यासवर्ग व कार्यशाळा असा कार्यक्रम झाला. माेरादाबाद हे कांही महाराष्ट्राच्या जवळपास नाही. पण अलीकडे प्रत्येक अभ्यासवर्गाची माहिती ऑन लाईन असल्याने ती त्वरित उपलब्ध करता येते. त्यांच्या मते एक गाय किंवा गाेवंश घरी असेल, तर त्याच्या आधारे पाच एकर जैविक शेती करता येते. या गाेआधारित शेतीत धाेतऱ्याचा उपयाेग कसा करायचा हेही तेथे सांगण्यात आले. या मार्गदर्शन वर्गात कृषिसंशाेधक डाॅ. ओम प्रकाश सिंह, डाॅ. विजय पाल सिंह, डाॅ. बलराज सिंह, डाॅ. जे. पी. सिंह, डाॅ. वृजराज सिंह यांनी मार्गदर्शन केले.शेतीला लागून मधमाश्या पालन केले, तर उत्पादन दुप्पट वाढण्याची शक्यता असते, याचीही त्यात माहिती देण्यात आली. जे तरुण गाेआधारित शेतीचा अभ्यास करत आहेत त्यांनी या विषयाची मुद्दाम माहिती करून घ्यावी. महाराष्ट्रात गाेविज्ञान संशाेधन संस्था, पुणे यांच्या पद्धतीने तर एका गाेवंशाच्या मदतीने तीस एकर बागाईत शेती म्हणजे उस, द्राक्षे, अशी नगद उत्पन्नाची शेतीही करता येते.तरीही अन्य पद्धतीत काही नवी नवी संशाेधने असतात. त्याची मुद्दाम माहिती घेणे आवश्यक असते.
माेरेश्वर जाेशी, 9881717855