संगीतसेवक

    08-Apr-2020   
Total Views |

Band_1  H x W:

मुलुंडच्या चिंतामण देशमुख उद्यानात अजस्र, न वाजणारी, वेगळीवेगळी वाद्यं ठेवली आहेत. वाद्यं वाजत नाहीत. कारण ती लाकडाची, शोभेच्या प्रतिकृती आहेत. उद्यानात येणाऱ्या चिमुकल्यांना वाद्यांची ओळख व्हावी म्हणून ही वाद्यं ठेवली आहेत. आजी-आजोबांबरोबर येणारी छोटुकली पाहता पाहता वाद्यं ओळखायला शिकतात. ती वाद्यं प्रत्यक्षात कशी वाजतात हे नातवंडांना आजोबा तोंडाने आवाज काढून दाखवतात. ओकांनी आजोबांच्या प्रयत्नांना दाद दिली. त्यावर मोकाशी म्हणाले, 'वाद्यांचे आवाज तोंडातून काढून दाखवता येणार नाहीत. या सर्व वाद्यांशी माझी उत्तम ओळख, वयाच्या दहाव्या वर्षांपासून आहे. कारण मी आमच्या व्यायामशाळेच्या बॅण्डपथकात होतो.' यावर छद्मी हसत मोकाशींचे बालमित्र ओक म्हणाले, 'परब, ऐकून ठेवा. मोकाशी बॅण्डपथकात? वा!' परबांच्या मनात संशय निर्माण करण्याचा ओकांचा दुष्ट हेतू साध्य झाला नाही, उलट घडलं.

परब म्हणाले, 'मोकाशी, एवढ्या लहान वयात तुमचा संगीताकडे ओढा होता याचं मला कौतुक वाटतंच; वरती वयाच्या ८३ व्या वर्षी, तुम्हाला तुमचे बॅण्डपथक आठवतं याचं दुप्पट कौतुक वाटतं. तुमची स्मरणश्नती छान आहे.' मनातून खवळलेले ओक शांतपणे म्हणाले, 'मोकाशी, परबांची शपथ घेऊन, तुम्ही कोणतं वाद्य वाजवत होता ते सांगा. परबांच्या गळ्याला हात लावून शपथ घ्या.' मपरब व ओक हे माझे जवळचे मित्र आहेत. आणखी पंधरा-सोळा वर्षं आम्ही जगलो की आम्ही तिघे शंभरी गाठू. आम्ही तिघे सोनं आहोतच; पण शंभर नंबरी सोनं म्हणजे शुद्ध सोनं हा वाक्प्रचार मला माहीत आहे. शुद्ध सोनं होण्यासाठी आम्हा तिघांना वयाची शंभरी गाठणं भागच आहे! त्यामुळे परबांच्या जीवाला धोकादायक ठरणारी खोटी शपथ न घेता, 'मला एकही वाद्य वाजवता येत नाही, मात्र मी दहा वर्ष बॅण्डपथकात होतो' हे सत्य मी ठासून सांगितलं.

ओकांच्या चेहऱ्यावर आश्चाचर्याचा मागमूस नव्हता. कारण त्यांना सत्य माहीतच होतं. परबांनी अचंब्यानं विचारलं, 'एकही वाद्य वाजवता येत नसताना तुम्ही दहा वर्षं बॅण्डपथकात केलंत तरी काय?' मी खुलासा केला, ममला बॅण्डपथकात जायची तीव्र इच्छा होती. पण अथक प्रयत्न करूनही बासरी, ढोल, ड्रम, बिगुल, झांजा, डफ यांपैकी एकही वाद्य मला थोडंसंही वाजवायला जमलं नाही. पंचाक्षरी स्वामी नावाचा माझा एक मित्र प्रकृतीनं एकदम किरकोळ होता; पण लेकाचा ढोल वाजवण्यात तरबेज होता. बँड व्यायामशाळेचा म्हणून लग्नसमारंभात व व्यायामशाळेला मदत होते या दोन कारणांमुळे बँडला भरपूर मागणी होती. लग्न म्हणजे वरात आली. वरात सर्व देवालयांच्या समोरच्या रस्त्यावरून जायची. पंचाक्षरी स्वामीला ढोल मानेला बांधून घेऊन वाजवत रस्तोरस्ती हिंडणं जमेना! मी कुस्ती खेळणारा होतो. मानेवर लोखंडी कडं ठेवून मी बैठका मारत असे. बँड पथकात येण्याची माझी धडपड सर्वांना माहीतच होती. ढोलवाहक म्हणून मी पथकात सामील झालो. मी माझ्या मानेवर ढोल टांगायचो व पंचाक्षरी तो वाजवायचा.फ ओकांनी तोंड उघडले, 'परब, दहा वर्षे मानेवर ढोलाचं ओझं वाहणं हा मोकाशींचा ढोल या वाद्याशी परिचय, वा! काय परिचय? राजकन्येची कार चालवणाऱ्या ड्रायव्हरने, राजकन्या माझी जवळची मैत्रीण आहे हे सांगायला काहीच हरकत नाही!' परब म्हणाले, ममला मनापासून मोकाशींच्या त्यागाचे कौतुक करावंसं वाटतं.

(क्रमश:)

- भा.ल.महाबळ