आनंदरंग (भाग २ )

    07-Apr-2020   
Total Views |
anand_1  H x W:

'ओक, मी काय म्हणून काम करू? सर्व कामांची जबाबदारी मी केव्हाच घरातील इतरांवर सोपवली आहे. मी फक्त योग्य निर्णय घेतो. काहीही करायचं असेल तर ते माझी परवानगी घेतात. मी सांगतो त्याप्रमाणे वागतात. यामुळे आमचं कुटुंब एकसंध राहिलं आहे.'

'मोकाशी, तुम्ही योग्य निर्णय घेता हा भ्रम सोडा. तुमच्या घरातील मंडळी समंजस आहेत म्हणूनच तुमचं घर एकसंध राहिलं आहे. तुम्ही वयानं सर्वात वडील म्हणून योग्य निर्णय घेणारे समजता की काय? आपण वृद्धांनी ज्ञानेश्वरांची एक ओवी ध्यानी ठेवायला हवी-

'जेयाचे आयुष्य धाकुटे होए ।बल, प्रज्ञा जिरौनि जाए । 
तेयाचे नमस्काररिजिती पाए ।वडील म्हणौनी ।।'

आपलं शिल्लक आयुष्य दहापंधरा वर्षांचं, ही वर्षं कशी? तर शक्ती व बुद्धी नसलेली, तरीही तरुण पिढी, केवळ आपल्या वयाकडं पाहून आपल्याला नमस्कार करते.'परबांनी न विचारता माहिती दिली,

'बाळ काय जाणे जीवनउपाय । मायबाप वाहे सर्व चिंता । 
तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता।आमुची ते सत्ता तयावरी ।।

मोकाशी म्हणाले, 'तुम्ही परब मंडळी सुखी आहात. चार पिढ्या तुम्ही वारकरी आहात. सर्व परबांचं शंभर वर्षे बाळपण चालू आहे! विठ्ठलाला बाप म्हणायचं व त्याच्याकडून सर्व करून घ्यायचं!'

'मोकाशी, परबांना जरा वेळ बाजूला ठेवा. कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी कामाचं वाटप करू नये, या मताचा मी आहे. घरातील कामे तशी सर्वांची असतात. काम करताना तुझे माझे असे काही नसते, नसावे. दूध तापवत ठेवल्या ठेवल्या, आजी वा सून यापैकी कोणी तरी म्हणातं, 'आजोबा, दुधाकडं पहा. श्री का रडतो आहे मी पाहून येते.' अशावेळी दूध तापवणे हे आजोबांचे काम होऊन जाते. बादली भरून वाहते आहे, नळ चालू आहे, हे कुटुंबातील कोणीतरी पाहतं. पाहणाऱ्यानं नळ सोडलेला नसतो, तरीही नळ बंद करणं हे त्याचं काम होऊन जातं. नातवंडांची शाळेची तयारी करून त्याला वेळेवर स्कूलबसमध्ये बसवणं हे महत्त्वाचं काम आहे. घरातील कोण्या एकानं ते रोज करायलाच हवं. जो मोकळा असेल त्यानं, 'मी ईशानला खाली सोडून येतो' असं ओरडून सांगून खाली गेलं पाहिजे. वीज-टेलिफोनची बिले आजकाल ऑनलाइन सहजी देता येतात. ही कामे आपण आजोबा करू शकत नाही; एक तर आपल्याकडे एवढे पैसे नसतात. वरती अशा प्रकारे तंत्रवापराचे ज्ञानही आपल्याकडे नाही. ही कामे तरुण मंडळीच करतात.'

'ओक, मी मोकाशी स्पष्टवक्ता आहे. तुमच्या घरी कामांचे शिस्तशीर वाटप दिसत नाही. अंदाधुंदीचा कारभार दिसतो. मला तुमचं कुटुंब विस्कळीत दिसतं, एकसंध वाटत नाही.' ओक म्हणाले, 'मोकाशी, कुटुंब म्हणजे ऑफिस नाही. ऑफिसात कामाचं वाटप केलं जातं, जबाबदारीही ठरवली जाते. कुटुंबातही स्थूल स्वरूपात कामे ठरलेली असतात, पण जबाबदारी सर्वांची असते. ऑफिस आठ तासांचं असतं, घर काही पिढ्यांचं असतं. आम्ही तीन पिढ्या घरात राहतो. आम्ही नुसते परस्परांना पाहत नाही, परस्परांना कामे करताना पाहतो. आम्ही शेजारी नाही, आम्ही कुटुंबीय आहोत.'

ओकांच्या पाठीवर थाप मारत परब म्हणाले,

जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा । 
विठ्ठलभक्त परबांच कुटुंब फार म्हणजे फारच मोठं होतं, वरती ते रंजल्या-गांजल्यांचे होते. अशा कुटुंबाचे कुटुंबप्रमुख होणं बाजूलाच ठेवा, अशा कुटुंबात राहायलाही मोकाशी तयार नाहीत! मोकाशींना ओकांच्या कुटुंबात दुय्यम स्थान पत्करून राहायचं नाही, ते नातवंडाला स्कूलबसमध्ये बसवायचं सुनेचं काम का म्हणून करतील? हां! मोकाशींची एक इच्छा मात्र आहे; त्यांना संत परबांच्या रंजल्यागांजल्यांच्या कुटुंबात कामाचे कसलेही वाटप न करता, सर्वच्या सर्व कामे करण्याकरिता, स्वयंसेवक म्हणून ओकांना पाठवायचं आहे.

(क्रमश:)

- भा. ल. महाबळ फोन 
 ०२२-२१६३१९४०