प्रेम महत्त्वाचं!

    13-Apr-2020   
Total Views |
 
zdxcvx _1  H x
 
 
ते ठीक आहे. बघण्याचा कार्यक्रम  कोठे व कसा झाला? मोकाशी, बघण्याच्या कार्याक्रमाची  गरजच काय? आम्हा दोघांच्या वडिलांनी ठरवलं, लग्न झालं. तुमची व तुमच्या पत्नीची मतं, मनं जुळतात का नाही हे तुम्ही लग्नाच्या पूर्वी पाहिलं नाही? मोकाशी, आमची मतं जमणारच. आमची दोघांची घरं विठ्ठलभक्त  आहेत. म्हटलंच आहे-मते माझे सोयरे सांगाती । पाय आठविती विठोबाचे । तुका म्हणे जैसी आवडती हरिदास । तैशी नाही आस आणिकांची । माझी पत्नी व मी दोघंही विठ्ठलभ्नत, दोघंही सोयरे, आमचं पूर्ण जमलं.
 
ओकांनी तोंड उघडलं, मोकाशी, तुम्ही हरिदास नसतानाही परब तुमच्याशी बोलतात हे तुम्ही तुमचं भाग्य समजा! मओक, तुमच्या विवाहाची कथा सांगा.फ विवाह कसे जमतात हे जाणण्यासाठी मी, मोकाशी नेहमीच उत्सुक असतो, घटस्फोटाबाबत थोडा जास्त! ओक सांगू लागले, मसाठ वर्षांपूर्वीची ही कथा आहे. पाहण्याच्या वेळी माझी पत्नी आपणहून म्हणाली, तुम्हाला काही विचारायचे असेल तर नंतर विचारा. माझी आवड प्रथम सांगते. मला संस्कृत सुभाषितं खूप आवडतात. तुम्हालां?
 
ओकांचं शाळेपासूनचं संस्कृत प्रेम मला व माझी संस्कृताची धास्ती ओकांना परिचयाची आहे; पण बायको पुढाकार घेऊन दाखवण्याच्या प्रसंगी बोलते हे मला दहशतवादी कृत्य वाटते! मी माझा वासलेला आ प्रयत्नपूर्वक बंद केला. ओक बोलत होते, मी होय म्हणालो. त्यावर कुसुम म्हणाली, सुभाषित म्हणजे ज्ञानाचं कॅप्सूल, अत्तर, सार. धर्म म्हणजे काय हे सांगणारं सुभाषित मला अत्यंत प्रिय आहे. मन तत परस्य संदध्यात्, प्रतिकूलम् यत आत्मन: । एष: संक्षेपत: धर्म:, अन्य: कामात् प्रवर्तते । जे आपल्याला नकोसं, अडचणीचं वाटतं ते आपण इतरच काही करतो ते स्वार्थप्रेरित असतं. कुसुम असं म्हणाली आणि मग काय? मी अर्धा तास कुसुमला सुभाषितं ऐकवत सुटलो. कुसुम रंगून ऐकत होती. सुभाषित प्रीती जुळली, लग्न झालं.
 
मी आश्चर्याने  म्हणालो कमाल आहे! सुभाषित प्रेमापोटी लग्न जमलं, वा! ओक, मी अनेक वर्षं तुमच्या घरी येत आहे, पण वहिनींचं संस्कृतप्रेम माझ्या कधीच कसं कानांवर पडलं नाही? ओक, पुटपुटले, मकसं पडणार? कुसुमला संस्कृत मुळीच येत नाही. लग्नानंतर मी विचारलं तेव्हा मराठीत मुसमुसत ती म्हणाली, मनानांनी व तात्यांनी एवढं एकच सुभाषित व काय बोलायचं हे माझ्याकडून घोटून, पाठ करून घेतलं होतं. मी तसं केलं. तुम्ही नानांना व तात्यांना विचारा. मी काय विचारणार? तात्या माझे वडील व नाना कुसुमचे वडील! ओक, म्हणजे लग्नाच्या बाबतीत तुम्हाला संस्कृतनं फसवलं! मी खुशीने चुकचुकलो. मपण कुसुमचं मराठीतील मुसमुसणं संस्कृत सुभाषितांप्रमाणे गोड होतं. कुसुमच्या पदार्थांना उत्तम चव आहे. त्यामुळे लग्नानंतरची गेली साठ वर्षं, कुसुमकडं संस्कृत नसूनही बेचव झाली नाहीत.
 
ओकांमधील प्रामाणिक मराठी नवऱ्यानं कबुली दिली. परब म्हणाले, आपण तिघे भाग्यवान नवरे आहोत. आईवडिलांनी आपल्यासाठी बायको निवडली. ते जोखमीचं काम त्यांनी आपल्यावर सोडलं नाही. आपला गरिबीतील संसार बायकांमुळे सोन्याचा झाला. मपतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशा परी । तुका म्हणे, एकविध झाले मन । विठ्ठलावाचून नेणे दुजे । तुकोबांनी मएकविध मनफ करायला विठ्ठल मिळाले, पण बायकांनी आपल्याला प्रमाण मानावं असे नवरे आपण आहोत का याचा आपण तिघांनी विचार करावा.फ माझे तुमचे आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी माझे तुमचे या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.
  (क्रमश:)
 
                                                                                                                   - भा. ल. महाबळ
                                                                                                               फोन : ०२२-२१६३१९४०