लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार बंद असल्याने शहरात सुमारे ५०० टन कचरा कमी झाला आहे. प्रामुख्याने रस्त्यावरील कचरा, तसेच हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. पुणे शहरामध्ये १० लाखांहून अधिक मिळकती आहेत. या मिळकतींमध्ये निर्माण होणारा कचरा, तसेच सार्वजनिक रस्त्यांच्या झाडण कामाचा कचरा, हॉटेल व व्यावसायीक आस्थापनांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच नैसर्गिकरित्या झाडांचा पाला पाचोळा, नारळाच्या झावळ्या, फांद्या या गार्डन वेस्टचाही यामध्ये समावेश आहे. कोरोना रोगाच्या साथीच्या पाश्र्वभूमीवर १५ मार्चनंतर शहरात प्रथम जमावबंदी आणि नंतर राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या असून, नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. यामुळे इतरवेळी शहरातील रस्त्यांवर दिसणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही जवळपास शून्यावर आले आहे.
प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर ओल्या कचऱ्याची निर्मिती होते, तो हॉटेल व्यवसायही बंद ठेवण्यात आला आहे. याठिकाणी दररोज २०० मे.टन ओला कचरा गोळा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस प्लांट सुरू करण्यात आले आहेत. तसेच घरांमध्ये निर्माण होणारा सुमारे ८० टन कचरा हा सोसायट्यांच्या आवारातील गांडूळ खत प्रकल्पांमध्ये जिरवण्यात येतो. कचरा वेचकांच्या माध्यमातून सुमारे ७५ टक्के घरातून ओला व सुका कचरा गोळा केला जातो. कचरा वेचकांकडून सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक व अन्य पुनर्वापरात येणाऱ्या वस्तू विलग केल्या जातात. तर झाडांच्या पालापाचोळ्यापासून निर्माण होणारे गार्डन वेस्ट स्वतंत्ररित्या गोळा करण्यात येते. १५ मार्चनंतर मात्र, सर्वच प्रकारचा कचरा मिळून सुमारे ५०० टन कचरा कमी झाला आहे. साथीच्या रोगाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज घराघरातून कचरा गोळा करून प्रक्रिया प्रकल्पांवर नेण्यात येत आहे, अशी माहिती सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.