खटला

    10-Apr-2020   
Total Views |

Law_1  H x W: 0

सार्वजनिक उद्यानात आवाजच आवाज असतात. छोटी पाच वर्षांखालची मुले पळापळी करताना आनंदाने चित्कारत असतात. ही मुले पाचशे-सहाशे चौरस फुटांच्या ब्लॉकमध्ये, एकटीदुकटी, दिवसभर बंदिस्त असतात. त्यांना उद्यानात लांबरुंद, प्रशस्त हिरवळ व आपल्यासारखी मुलेच मुले पाहायला, खेळायला मिळतात. मुले खिदळणारच. वृद्धापकाळामुळे ज्यांना बोलण्यापलीकडे काही जमत नाही व ज्यांचे मुलगा-सून-नातवंडे, नोकरी व शिक्षण या कारणाने, दिवसभर घरात नसतात असे एकाकी, ज्ञानी आजोबा उद्यानात फुलतात. राजकारण व भ्रष्टाचार या विषयांवर ते तोंडात खोकल्याची उबळ फुटेपर्यंत तावातावानं मुद्दे मांडतात.


सर्व आजारांवर मात करून मोकाशी संतापून कडाडले, 'ओक, तानाजी को हाजिर करो.' ओक दचकले, पण समोर मोकाशींचे उघडलेले तोंड पाहिल्यावर पूर्ण स्वस्थ झाले व म्हणाले, 'मोकाशी, उद्यानात येताना, घरात झालेले अपमान मागं सोडायचे. नोकरीत साहेब अपमान करायचे, निवृत्तीनंतर साहेबांची जागा बायकोनं घेतली, असं समजायचं. मी कामाच्या बाईंना माझा चष्मा पाहिलात का, असं विचारलं, तिनं प्रथम माझ्याकडं लक्षच दिलं नाही. नंतर तिनं मुद्दाम मला माझ्या मुलाचा चष्मा आणून दिला. सोनेरी काड्यांचा, श्रीमंती चष्मा पाहून मी नापसंती दाखवली तर शेवंता म्हणाली, 'भाऊसाहेब, मुलाची कार तुम्ही वापरता, आज त्याचा चष्मा वापरा!' मी काही बोललो नाही. शेवंता या खोडसळ कामवालीला मनातून बाहेर काढून घरात सोडली व उद्यानात दाखल झालो.' परब म्हणाले, 'ओक, तुमचा चष्मा तुमच्या डोळ्यांवर आहे!' 'चष्मा माझ्याजवळच होता, हरवला नव्हताच. शेवंता खोडसाळ आहे. ती फक्त माझ्या बायकोचं, सुनेचं व नातीचं ऐकते. म्हणून तिला धडा शिकवला.'


परब शांतपणे म्हणाले, 'ओक, तुम्हीही शेवंताप्रमाणेच खोडसाळ वागलात. तुकोबा म्हणतात, 'मना सांडि हे वासना दुष्ट खोडी । मनी मानसी एक हे व्यर्थ गोडी ।।' खोडसाळपणात गोडी शोधू नका, खरी गोडी विठ्ठलनामात आहे.' मनिरर्थक चर्चा नको. मी गंभीर आहे. तानाजी को हाजिर करो.' मोकाशींचा आवाज चढाच होता. परब काकुळतीनं म्हणाले, 'मोकाशी, हा तानाजी कोण? तो तुम्हाला का हवाय?'

'काल चिनू एक पुस्तक वाचत होता. त्यात तानाजी मालुसरेवर धडा होता. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सरदार कोंडाणा किल्ला सर करताना, युद्धात ३ एप्रिल १६६३ रोजी कामी आले. त्या तानाजींना हाजिर करा.' ओकांनी विचारलं, 'मोकाशी, तुम्हाला अधूनमधून वेडाचे झटके येतात का हो? तुम्हीच सांगता की तानाजी १६६३ मध्ये मरण पावले, चालू वर्ष आहे २०१७, साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या तानाजींना आपण जिवंत कसे करणार? तानाजींवरचा धडा वाचून तुम्ही व्याकुळ झाला आहात. तुम्हाला आजच्या काळात चीनशी लढण्यासाठी तानाजी हवे आहेत. ते आश्चर्य आहे. आपण तानाजींचे पोवाडे गायचे, त्यांच्या चरित्रापासून स्फूर्ती घ्यायची.' परब म्हणाले, 'मोकाशी, तुकोबा शूरांचा गौरव करतात, 'शूरत्वासी मोल । न ये कामा फिके बोल ।। धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।' केवळ शब्दांना महत्त्व नाही हे तानाजींना माहीत होतं, म्हणून त्यांनी तलवार उचलली. तानाजींनी किल्ला जिंकला. कारण नारायण सहाय्याला होता.' 


'मला तानाजींवर खटला चालवायचा आहे. त्यासाठी तानाजी को हाजिर करो.' मोकाशींनी हेतू स्पष्ट केला. कपाळावर हात मारून घेत ओकांनी तोंडाचा शंख फुंकला, 'तुम्हाला वेडाचे झटके येत नाहीत. तुम्ही तर ठार वेडेच आहात! फक्त चहा पिताना व दोन वेळा जेवताना तुम्हाला शहाणपणाचे झटके येत असणार.

(क्रमश:)

- भा.ल.महाबळ