काेकाकाेलाने बरबाद केला मेक्सिकाे

    14-Mar-2024
Total Views |
 
 

coco 
 
काेकाकाेला या साखरपाण्याने अमेरिकेपासून जगातल्या बहुतेक देशांमध्ये बरबादी केलीच आहे अनेक पिढ्यांची. पण मेक्सिकाेमधली कहाणी सगळ्यात भयंकर आहे. तिथल्या मूलनिवासींमध्ये टाइप टू डायबेटिसचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्याचा थेट संबंध या देशाला लागलेल्या काेकवेडाशी आहे. तरीही लाेक सुधारत नाहीत आणि तिथलं सरकार काहीही प्रतिबंधात्मक उपाय करत नाही. त्यांना काेकाकाेलाने पूर्णपणे मिंधे बनवून ठेवलं आहे. काेकाकाेलाचा माणशी खप जगभरात सगळ्यात जास्त मेक्सिकाेमध्येच आहे. एकेकाळी काेकाकाेलाच्या फॅक्टरीत काम करणारा एक किरकाेळ कामगार पुढे माेठा झाला आणि मेक्सिकाेच्या अध्यक्षपदावर पाेहाेचला.
 
तेव्हा काेकने त्याच्याकडून असा नियम करून घेतला की एखादी कंपनी एखाद्या भागातली जमीन विकत घेईल तेव्हा आसपासचे डाेंगर, नद्या नाले, यांच्यावरही तिचीच मालकी प्रस्थापित हाेईल. या नियमाचा गैरवापर करून काेकने आपल्या कारखान्यातलं घाण पाणी नद्यांमध्ये साेडून त्या प्रदूषित केल्या. आज पिण्याचं पाणी तिथे इतकं अशुद्ध आहे की शुद्ध पाणी पिण्यापेक्षा काेक पिणं परवडतं, काेका काेला पाण्यापेक्षा स्वस्त आहे.एक क्लासिक उदाहरण एका देवऋषी बाईचं आहे, त्याचा व्हिडिओ आहे. डायबिटीसग्रस्त माणूस तिच्याकडे उपचारासाठी गेला तेव्हा तिने तिच्या देवाला काेकाकाेलाचा प्रसाद अर्पण केला आणि देवाचा प्रसाद म्हणून त्या राेग्यालाही काेकच प्यायला लावला!